श्री चिदानंद अष्टक (मराठी)

श्री चिदानंद अष्टक (मराठी)

ज्याच्या पदस्पर्शने धन्य भूमी
जयाच्या तपाने शशीसूर्य व्योमी

भक्तीतुनी तोषवी रामचंद्र
नमस्कार माझा सद्गुरु चिदानंदा

जशी माऊली बालका घास देते
तसे ज्ञान ज्यांच्या मुखी होय सोपे

अशा ज्ञानमार्तंड कारुण्य कंदा
नमस्कार माझा सद्गुरु चिदानंदा

सदा विश्वकल्याण चिंता मनाशी
सदा आर्त पतितास घेई उराशी

सेवाव्रती पुण्यशाली मुनिंद्रा
नमस्कार माझा सद्गुरु चिदानंदा

हरिकीर्तनी रंगते नित्य वाचा
नमस्कारिता ताप हारी भवाचा

न पाही कधी वंश वा धर्मभेदा
नमस्कार माझा सद्गुरु चिदानंदा

सदा प्रीतीने रक्षितो प्राणिमात्रा
कृतीतूनी दे नित्य वेदान्तमात्रा

 

दिसे ब्रह्म सर्वत्र नेत्रारविंदा
नमस्कार माझा सद्गुरु चिदानंदा

असा योगमार्गावरी दीपदर्शी
पातंजली हा जणू आंग्लभाषी

सुखे प्राण रोधी करी बंध मुद्रा
नमस्कार माझा सद्गुरु चिदानंदा

रहा दिव्यरूपी सदा आपुलीया
वसे सर्व कल्याण केंद्री तयाच्या

उपदेशितो हे सदा शिष्यवृंदा
नमस्कार माझा सद्गुरु चिदानंदा

नमस्ते सदा भक्तवात्सल्यरूपा
नमस्ते परब्रह्म रूपा अरूपा

नमस्ते शिवानंद हृदयारविंदा
नमस्कार माझा सद्गुरु चिदानंदा

करी जो सदा पाठ या अष्टकाचा
तयाच्या शिरी हात राहो गुरुंचा

झडो देहबुद्धी मिळो ज्ञानशांती
असे प्रार्थना हीच पायास अंती!

रचना – सौ. राजलक्ष्मी देशपांडे